अमित शाहांना बोलावणार्‍या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे; १ ऑगस्टच्या पुणे दौर्‍यावरून संजय राऊतांचा संताप

Foto
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या १ ऑगस्ट रोजी होणार्‍या पुणे दौर्‍यावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमित शाह हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येत आहेत. यावरून आधीच काही पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून पुणेकरांसह अमित शाहांवर तोफ डागली आहे.
 
अमित शाह यांच्या आगामी पुणे दौर्‍यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी पुणेकरांना या कार्यक्रमाचा निषेध करण्याचे आवाहन केले. अमित शाह यांना लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, त्यावरती बोलताना राऊत म्हणाले, ज्यांनी तरुण मुलांवर गोळीबार आणि लाठीमार करणार्‍या अमित शाह यांना पुण्यात कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. ज्यांचे हात लहान मुलांच्या रक्ताने माखले आहेत, त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातोय. संपूर्ण पुणेकरांनी आणि शिवसेनेने या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला पाहिजे.

 जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या कारवाईवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत बोचर्‍या शब्दांत हल्लाबोल केला आहे. पूर्वी आम्ही जालिवाला बागेत जनरल डायर पाहिला होता, पण जंतरमंतरवर आम्ही मजनरल कायरफ पाहिला, असा टोला लगावत राऊत यांनी अमित शाह यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 लापता गृहमंत्री; पॅलेट गन चालवण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच!
संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, पूर्वी लापता लेडीज नावाचा चित्रपट आला होता, आता मी मलापता गृहमंत्री नावाचा चित्रपट बनवण्याचा विचार करतोय. तुमच्या नावाने जंतरमंतरवर एवढं मोठं कांड घडलं, विरोधी पक्षनेते तुमच्या नावाने भाषणे करत आहेत, तरीही गृहमंत्री अमित शाह नेमके कुठे आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या जनरल डायरीचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये डीसीपींनी पॅलेट गन आणि अश्रूधुराच्या नळकांड्या चालवण्याचे आदेश दिल्याची नोंद आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असल्याने पोलिसांचे नेतृत्व आणि थेट आदेश देण्याचा अधिकार फक्त केंद्रीय गृहमंत्र्यांनाच असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेला हा लाठीहल्ला आणि गोळीबार अमित शाह यांच्याच आदेशाने झाला आहे.

अमित शाह दोन्ही बाजूने अपराधी; राजीनाम्याची मागणी
राऊत पुढे म्हणाले की, पुलवामा आणि पहलगाव हल्ल्याच्या वेळीच अमित शाह यांना पदावरून दूर करायला हवे होते. मात्र राष्ट्रीय सुरक्षेचा विषय म्हणून विरोधी पक्षाने तो विषय ताणून धरला नाही. परंतु, आता या सर्व पापांचे फळ अमित शाह यांच्याच पदरात टाकावे लागेल. 

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सभागृहात गोळीबार झालाच नाही असे दिलेल्या वक्तव्यावर राऊत म्हणाले की, जितेंद्र सिंह हे पीएमओचे राज्यमंत्री आहेत, ते फक्त लिहून दिलेली भाषणे वाचतात. संसद मार्ग पोलीस ठाण्याची जनरल डायरी खोटे बोलत नाही. आगामी काळात या डायरीची पाने १०० टक्के समोर येतील.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना राऊत म्हणाले, जर अमित शाह यांना न विचारता पोलिसांनी गोळीबार केला असेल, तर त्याचा अर्थ पोलीस तुमचे ऐकत नाहीत, तुमचे लक्ष नाही आणि तुम्ही अकार्यक्षम आहात. तर तुम्ही तरुण विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने विचार केला तर अमित शाह हेच अपराधी ठरतात आणि त्यांचा राजीनामा मागाने हे राष्ट्राचे कर्तव्य आहे.

कोर्ट करप्ट झाले नसेल तर १२० टक्के आमदार अपात्र ठरतील
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर बोलताना संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवरही स्पष्ट शब्दांत भाष्य केले,  घटनेतील १० व्या अनुसूचीनुसार जर सर्वोच्च न्यायालयाने निष्पक्ष निर्णय दिला, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला प्रत्येक माणूस १०० टक्के अपात्र ठरेल. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही भलत्याच ऐर्‍या-गैर्‍यांच्या हातात देणे हा सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी मिळून केलेला देशातील सर्वात मोठा राजकीय घोटाळा आहे.

तरुण मुलांना आणि बेरोजगारांना कॉकरोच(म्हणणे कोणत्या संविधानात बसते? जर न्यायालय भ्रष्टाचाराला, पक्षफुटीला आणि अन्यायाला खतपाणी घालणार असेल, तर जनतेने आणि विरोधी पक्षाने गप्प बसायचे का? जर कोर्ट करप्ट झाले नसेल, तर निर्णय घटनेनुसारच आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूनेच लागेल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.